नाशिक – गेल्या तीन महिन्यामध्ये महापालिकेच्या कोविड हेल्पलाईनवर खासगी हॉस्पिटल्सच्या तक्रारींचा चक्क पाऊस पडला आहे. सॅनिटायटेशन, औषधे, जास्त शुल्क आकारणे आदींबाबत हेल्पलाईनवर तब्बल ४३०० तक्रारी आल्याने खासगी हॉस्पिटल्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
महापालिकेने कोविड हेल्पलाइन क्रमांक 9607601133 आणि 9607432233 २४ तास कार्यरत असतात. खासगी रुग्णालयांविरोधात तक्रारी नोंदविण्यासाठी किंवा कोविड -१९ संबंधित तक्रारी सादर करण्यासाठी या हेल्पलाई आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे आलेल्या बहुतेक तक्रारींचे निराकरण केले आहे. आणि उर्वरित काही तक्रारी सोडवण्याची प्रक्रीया सुरु आहे. त्याशिवाय कोविड -१९ कॉल सेंटरच्या हेल्पलाइनवर माहिती मागणार्या लोकांकडून महापालिकेला आणखी २ हजार ५०० कॉल आले आहेत.
कोविड -१९ आणि खाजगी रुग्णालयांशी संबंधित काही समस्या असल्यास शहर रहिवाशांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आम्ही सुमारे तीन महिन्यांपूर्वी हेल्पलाईन सुरू केली. खासगी रुग्णालयांविरोधात आमच्याकडे सुमारे ४३०० विविध तक्रारी आल्या आहेत, असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेषतः इस्पितळात अयोग्य सॅनिटेशन, औषधांची अनुपलब्धता, फुगवलेली (जादा, अवाजवी) बिले इत्यादी तक्रारी आहेत. आम्हाला हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या संशयित आणि माहिती झालेल्या रूग्णांच्या रहिवाशांच्या किंवा कुटूंबाच्या तक्रारींचे निराकरण आम्ही केले आहे. खासगी रुग्णालयांविरोधात रुग्णांकडून होणाऱ्या काही तक्रारींवर आम्ही चौकशी करत आहोत, ज्याचे लवकरच निवारण केले जाईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या तक्रारींव्यतिरिक्त, विलगीकरण, स्वॅब चाचण्या, खासगी रुग्णालयात प्रवेश, बेडची उपलब्धता इत्यादी विषयी मार्गदर्शन मागविणार्या २६००हून अधिक कॉल आल्याचे त्यांनी सांगितले.