नवी दिल्ली – भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. भारतात निर्माण झालेली कोरोना लस निम्म्या जगाला हवी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच तब्बल ९२ देशांनी भारताकडे या लसीची मागणी नोंदवली आहे.
भारतात कोरोनाविरूद्धच्या लढाईत लसीकरण अभियान सुरू झाल्यानंतर इतर देशांमध्येही लसीकरण करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जगातील सुमारे ९२ देशांनी लसीच्या आयातीसाठी भारताकडे संपर्क साधला आहे. यामुळे लसीची निर्यात करणारे केंद्र म्हणून भारताची विश्वासार्हता बळकट झाली आहे.
गेल्या शनिवारी कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर भारतात तयार केलेल्या लसींचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांची मागणी वाढली आहे. डोमिनिकन रिपब्लिकचे पंतप्रधान रूझवेल्ट स्कर्ट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लस पाठविण्याची विनंती केली आहे. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले की, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो, ही लस पाठवा, त्यामुळे आम्ही आपल्या देशातील लोकांना साथीच्या आजारापासून वाचवू शकू.
शेजार धर्माचे पालन : ब्राझीलने ही लस आणण्यासाठी विशेष विमान भारतात पाठविले आहे. राष्ट्राध्यक्ष झैरे बोलसोनारो यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून लस पाठविण्याची विनंती केली आहे. दरम्यान, बोलिव्हिया सरकारने 5 लाख डोस कोरोना लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे. भारत सरकार सद्भावना व शेजार धर्म म्हणून नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारसह अनेक शेजारच्या देशांनाही लस पाठवित आहे.
भारतात दोन प्रकारच्या लसींचे डोस : कोविशिल्ड आणि कोव्हॉसिन या दोन लस देशभरात लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारतात दिली जात आहे. त्यापैकी कोविशिल्ट ही ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केले असून याची निर्मिती पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटने केली आहे. तर कोव्हॉसिन ही एक संपूर्ण स्वदेशी लस असून आयसीएमआरच्या सहकार्याने भारत बायोटेक याने ही निर्मिती केली आहे.
बांगलादेश, नेपाळला जाणार भारताची लस : शेजारच्या बांगलादेश आणि नेपाळशी मैत्री करीत भारताने कोविडपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी या लसीचे अनुक्रमे २० लाख आणि १० लाख डोस पाठविले. साथीच्या देशांचा सामना करण्यासाठी या लसीचे दोन्ही डोस मोफत देण्यात आले आहेत. भारत लवकरच म्यानमार आणि सेशल्सला लस पुरवणार आहे. यापूर्वी दीड लाख डोस हे भूतानला तर एक लाख डोस मालदीव्हला पाठविण्यात आले. भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स या शेजारील देशांना लवकरच लस पुरवण्याची घोषणा भारताने केली होती. श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस येथे लस पुरविली जाईल .