नाशिक – जिल्ह्यातील उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) या उद्योजक संघटनेवर आठवड्याभरपूर्वी गुरुवारी प्रशासकीय मंडळाने लावलेले सील बुधवारी दुपारी उघडण्यात आले. दरम्यान, सिन्नर येथील निमा कार्यालय अद्याप बंदच आहे. सह धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाने पुढील निर्णय येईपर्यंत केवळ दैनंदिन कामकाज करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय मंडळाने सांगितले.
निमाच्या निवडणुकीवरून सुरु असलेला वाद थेट न्यायालय व त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयात पोहोचला होता. धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी गुरुवारी निमावर तीन सदस्यीय (सहाय्यक धर्मदाय आयुक्त राम लिपटे,धर्मदाय निरीक्षक पंडितराव झाडे, धुळ्याचे अँड.देवेंद्र शिरोडे ) समिती नेमण्याचा निकाल दिला.या निकालानुसार समितीने गुरुवारीच सायंकाळी निमात येऊन निमाचे दप्तर ताब्यात घेतले.शिवाय निमातील सर्व कपाटे कुलूप बंद करुन निमाच्या मुख्य द्वाराला देखील सील करुन चावी घेऊन निघून गेले होते.
दरम्यान, यंदा निमा आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार होते. मात्र दोन गटात सुरु असलेला वाद व आपलापल्या परीने सुरु असलेले राजकारण यामुळे सध्या निमा या उद्योजक संघटनेची प्रतिमा मलीन झाली आहे. निमाच्या ५० वर्षाच्या इतिहासात आणि सुवर्ण महोत्सवी वर्षातील ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेकजण सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहे. दरम्यान, आज बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्रशासकीय मंडळाने निमाचे सील उघडत निमाचा कारभार हाती घेतला. पुढील निर्णय येईपर्यंत निमाचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरु करण्यात आले असल्याचे प्रशासक मंडळाने सांगितले.
आजी माजींना प्रवेश नाही
उद्योजकांचे प्रश्न वजा समस्या मांडण्यासाठी प्रशासकीय मंडळाने निमा सदस्यांना (उद्योजकांना) प्रवेश दिला आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत असणाऱ्या निमा सदस्यांना प्रवेश नाकरण्यात आला असून आजी माजी कार्यकारी मंडळाला निमा पासून दूरच राहावे लागणार आहे.