नाशिक – जगात कोविड -१९ चा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाद्वारा आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा प्रोटोकॉल जाहीर आला. या अंतर्गत महाराष्ट्र कोविड १९ आयुष टास्क फोर्सकडून परवानगी घेऊन नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्य शाखेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात ‘निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक’ सुरु करण्यात आले. सध्या राज्यात सुमारे ४०० क्लिनिक सुरु असून नाशिक जिल्ह्यात ५० क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु आहे. आतापर्यंत सुमारे १० हजाराहून अधिक रूग्णांनी फायदा घेत व्याधीमुक्ती मिळवली आहे. तर अनेकांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून आरोग्यसंवर्धन केले आहे. दुसरीकडे कोरोना काळात आयुर्वेद ही सक्षम उपचार पद्धती असून यात कुठल्याही दुष्परिणामांशिवाय व्याधी बरा होता हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेकजण या उपचार पद्धतीकडे वळत असून लोकांचा आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध यावर दिवसेंदिवस विश्वास वाढत असल्याचे दिसत आहे.
निमा आयुर्वेद इम्यनिटी क्लिनिकविषयी अधिक माहिती देतांना निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ जयश्री सूर्यवंशी सांगतात की, लसीकरणाने कोरोना नियंत्रणात नक्कीच आणता येईल. सोबतच रोग-प्रतिकारक शक्ति सुधारून, आजारावर नियंत्रण आणता येईल. लसीकरणाची परिणामकारकता ही लसीच्या उत्तम निर्मितीवर अवलंबून आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरांतर्गत, निसर्गदत्त प्रतिकारक शक्तीवर देखील आहे. भारतीय पारंपारिक आरोग्य व्यवस्थेत रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, टिकवुन ठेवण्यासाठी असलेल्या उपाययोजनांचा उपयोग समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने राज्यभर निमा आयुर्वेद इम्यनिटी क्लिनिक्स सुरु करण्यात आले. या क्लिनिकच्या माध्यमातून प्रत्येकाचा व्याधी क्षमत्व निर्देशांक तपासाला जातो. या निर्देशांकानुसार आपल्या शरीराची सद्य स्थिती काय आहे? व त्यानुसार स्वाभाविक व्याधिक्षमत्व वाढविण्यासाठी काय उपायोजना करण्याची आवश्यकता आहे याविषयी तज्ञ डॉक्टर समुपदेशन देतात. व्यक्तीसापेक्ष आहार, योगासने, दैनंदिन सवयी व जीवनमान व्यवस्थापन मार्गदर्शन केले जाते.
या क्लिनिकच्या माध्यमातून रूग्णांशी संवाद साधण सोपं झालं. क्लिनिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही रूग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करतो. याशिवाय रुग्णाला आधीपासून असलेल्या व्याधीचाही अभ्यास करतो. कारण अनेकदा रोगप्रतिकार शक्ती कमी होण्यामागे हेच मुख्य कारण असते. व्याधी मुळापासून नष्ट करण्याकडे आमचा प्रयत्न असतो. मात्र यासाठी रूग्णांनी नियमित उपचार घेणे खूप गरजेचे आहे असे त्या सांगतात.
दुसरीकडे आयुर्वेद उपचाराविषयी बोलतांना सांगितले की, कोरोना काळात सरकारकडून आयुर्वेदाची मदत घेऊन सरकारकडून जनसामान्यांच्या जीवनपद्धतीला अनुकूल अशी आहार-विहार पद्धती तसेच आयुष काढा व आयुष गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. त्यामुळे जनसामान्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊन रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे देशातील कोविड -१९ या वैश्विक महामारीची तीव्रता खूप कमी झाली. देशातील कोविड -१९ रुग्णांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेद्वारा अंदाजीत संख्येपेक्षा खूप कमी राहिली. तसेच त्याची तीव्रता सुद्धा तुलनेने कमी राहिली. यावरून स्पष्ट होते की आयुर्वेदिक औषधी द्वारा जनसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. यामुळेच लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत.
कोरोनासारख्या साथीच्या रोगांचे वैशिष्ट्य आहे की, जाती, वय, प्रकृती, रोगप्रतिकारक्षमता इत्यादी गोष्टी व्यक्तिपरत्वे भिन्न असूनही या रोगाची बाधा सर्वांना जवळजवळ एकाच वेळी व एकाच प्रकारची होते. प्रतिबंधक उपाययोजनेमुळे काही प्रमाणात साथीच्या रोगांच्या कारणांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. आयुर्वेदाचा गाभा असलेले दिनचर्या, रुतुचर्या, स्वच्छता आणि सामाजिक वावराचे संकेत हेच कोरोना प्रतिबंधक उपाय योजना म्हणून सर्वत्र अंगीकार करण्यात आले आहेत.
कोरोना काळात निमा नाशिकचे सचिव डॉ वैभव दातरंगे , खजिनदार डॉ प्रतिभा वाघ यांनी कोरोना साथी विरुद्ध विश्व आयुष कषाय वटी आपल्या सर्व सभासदाना निशुल्क उपलब्ध करून दिल्या. निमा नाशिक द्वारा राबविण्यात आलेल्या उपक्रमात संघटनेचे पदाधिकारी डॉ शैलेश निकम, डॉ भूषण वाणी, डॉ मनीष जोशी, डॉ तुषार सूर्यवंशी, डॉ अनिल निकम, डॉ. राहुल पगार, डॉ रविभुषण सोनवणे, डॉ परेश डांगे, डॉ प्रणीता गुजराथी, डॉ दीप्ती बढे, डॉ मनीष हिरे, यांचे सहकार्य लाभले.