नाशिक – निमा व इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी आत्म निर्भर भारत मिशन-व्यवसाय संधी या विषयावर झूम वेबिनार आयोजित करण्यात आला होता. सदर वेबिनार फेसबुक लाईव्ह होता. या वेळी औद्योगिक धोरण आणि विकास समिती अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी आत्मनिर्भर म्हणजे काय, शासकीय योजना व त्यांची अंमलबजावणी, उद्योगांनी स्वतः सक्षम होऊन रोजगारनिर्मितीची गरज असल्याचे सांगून याबद्दल माहिती दिली. यावेळी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी नाशिकची उद्योग वैशिष्ट्ये व उद्योगसंधी तसेच आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत येणाऱ्या शासकीय योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. सर्व उद्योजकांना आपल्या उद्योगांसाठी ई-गर्व्हनंन्स मॅनेजर नेमावा जेणे करून शासनाच्या योजनांची माहिती वेळेत व अमंलबजावणी सुरळीत होऊ शकेल असेही पेशकार यांनी यावेळी सांगितले. आत्मनिर्भर भारत मिशन हे सरकारचे नवे पाऊल असून सर्व उद्योजकांनी इंडियन कंपनी विथ इंडियन रॉ मटेरियल म्हणजेच व्होकल फाँर लोकल व्हावे असेही सांगितले. नाशिक जिल्हा हा कृषी व कृषीप्रक्रीया उद्योगाचे मोठे केंद्र होण्याची क्षमता या योजनेत आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे पेशकार म्हणाले. या वेबिनारमधून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून २६०० उद्योजकांनी सहभाग घेतला. शिवाय प्रश्न-उत्तर या भागात उद्योजकांच्या समस्या समजून घेण्यात आल्या. निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले .