नाशिक – नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) मधील वाद आता १४ दिवस क्वारंटाइन झाला आहे. निमा हाउसमधील काही कर्मचारी कोरोना संशयित असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून निमा हाउस १४ दिवस बंद ठेवले जाणार आहे. यासंदर्भात निमा कार्यकारिणीने महानगरपालिकेला कळविले आहे. त्यामुळे निमा हाउसवरील आजचा संभाव्य तणाव निवळला आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील निमा हाउसमध्ये आज (दि. २) काय घडणार याकडे सर्व उद्योजकांचे लक्ष लागून होते. कारण, विद्यमान निमा कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने विश्वस्त मंडळाने विशेष कार्यकारी समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती पदभार घेण्यासाठी आज निमा हाउसमध्ये येणार होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी या समितीला बेकायदेशीर ठरवले आहे. त्यामुळे त्यांना पाऊलही ठेऊ दिले जाणार नाही, असा पवित्रा सत्ताधारी गटाने घेतला. परिणामी, निमा हाउसमध्ये काय घडणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून होती. पोलीस बंदोबस्ताची मागणीही एका गटाने केली होती. मात्र, आता निमा हाउसच १४ दिवस बंद राहणार असल्याने निमातील वादही १४ दिवस थंड राहणार आहे.
दरम्यान, निमाचे जिल्ह्यात साडेतीन हजारांपेक्षा अधिक सभासद असून, निमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. अशा वर्षातच निमात वाद रंगल्याने ज्येष्ठ उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.