अध्यक्षपदी विवेक गोगटे, सरचिटणीसपदी आशिष नहार
नाशिक – निमाच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ ३१ जुलैला संपुष्टात आल्यामुळे विश्वस्त मंडळाने विशेष कार्यकारी समितीची स्थापना करून अध्यक्षपदी विवेक गोगटे, सरचिटणीसपदी आशिष नहार व खजिनदारपदी संदीप भदाणे यांची नियुक्ती केल्याची माहिती निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी दिली.
नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा ) च्या कार्यकारिणीचा कार्यकाळ ३१ जुलै २०२० रोजी संपुष्टात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होऊ न शकल्याने नवीन कार्यकारिणीची निवड होऊ शकली नाही. संस्थेची पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी विश्वस्त मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. त्यात घटनेतील कलम ३४.१ व ३४.३ नुसार विश्वस्त मंडळाला वरील परिस्थितीत विशेष कार्यकारी समिती गठीत करण्याचा अधिकार असल्यामुळे ही नियुक्ती विश्वस्त मंडळाने केल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
या बैठकीत मावळत्या कार्यकारिणीकडून विशेष कार्यकारी समितीस पदभार सुपूर्द करण्यात आला. या बैठकीस विश्वस्त अध्यक्ष मनीष कोठारी, सदस्य धनंजय बेळे, संजीव नारंग हे उपस्थित होते. तर निमंत्रित सदस्य व विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव व सचिव तुषार चव्हाण हे उपस्थित नव्हते, असेही पाटणकर यांनी सांगितले.
निवडीला विरोध
निमाच्या विश्वत मंडळाने घेतलेल्या निर्णयाला विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी विरोध केला. नियमाप्रमाणे आम्ही जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त यांना पत्र दिले होते. पण, त्यांनी काेरोनामुळे सर्व निवडणुकीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुढील निर्णय येईपर्यंत संस्थेचा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले.
वाद पोलीस स्थानकात
दरम्यान, निमाच्या या निवडीचा वाद पोलीस स्थानकात गेला असून, विद्यमान अध्यक्ष व सरचिटणीस यांनी लेखी तक्रार केली आहे. त्यात या निवडीला बेकायदेशीर म्हटले आहे.