नाशिक : निफाड तालुक्यातील शिवडी उपकेंद्र व शिवडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. या आरोग्य तपासणी शिबिरात रक्त तपासणी, सीबीसी., रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी, रक्तदाब, ऑक्सिजनलेवल यांसह इतर सर्व आजारांची तपासणी करण्यात आली. क्षीरसागर यांनी स्वत:ची सुद्धा आरोग्य तपासणी करुन घेत नागरिकांनी देखील वेळोवेळी स्वतःची आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन केले,
या शिबिरात १३५ नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घेतली, यापैकी काही रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र खडकमाळेगाव येथे संदर्भीत करण्यात आले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या यशानंतर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी पुन्हा आरोग्य शिबिरांच्या माध्यमातुन पुन्हा एकदा आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणार असल्याचे बाळासाहेब क्षिरसागर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समूह आरोग्य अधिकारी डॉ.कलीम पठाण, आरोग्य सहाय्यक खैरनार, परिचारिका जाधव, आरोग्यसेवक संतोष खालकर तसेच अविनाश चौधरी, गोरक्षनाथ ताजणे यांनी मेहनत घेतली.
सर्वरोग निदान शिबीर राबविण्यात येणार
नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिनस्त ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर शिवडी उपकेंद्र येथे राबविण्यात आलेल्या शिबिरांप्रमाणे सर्वरोग निदान शिबीर राबविण्यात येणार आहे. सदर शिबिरात रुग्णांच्या खर्चिक स्वरुपाच्या रक्त घटक व तत्सम तपासण्या मोफत केल्या जातील. ग्रामीण जनतेने या सर्वरोग निदान शिबीरांचा लाभ घ्यावा.
– बाळासाहेब क्षिरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक
…
शिबीरांचा निश्चित फायदा होईल
कोरोना साथरोग काळात ग्रामीण भागातील जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. या काळात आरोग्य शिबिरांचे आयोजनाचे नियोजन केल्यामुळे गोर गरीब जनतेस या शिबीरांचा निश्चित फायदा होईल.
– सौ.सुरेखा नरेंद्र दराडे, सभापती, आरोग्य व शिक्षण समिती, जिल्हा परीषद, नाशिक