नाशिक – राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी महाराजस्व अभियानांतर्गत लोकाभिमुख योजनांमधील अपिले लवकरात लवकर निकाली निघण्याच्या दृष्टीने निफाड आणि नाशिक उपविभागीय अधिकारी यांचेकडील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जिल्हास्तरीय उपजिल्हाधिकारी यांचेकडे वर्ग करण्यात आली असल्याचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात अपर जिल्हाधिकारी श्री. नडे यांनी म्हटल्यानुसार, महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे इतर जमिनीविषयक कायद्यांतर्गत उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग, नाशिक व उपविभागीय अधिकारी, निफाड उपविभाग, निफाड यांचेकडे अधिकार अभिलेख, अतिक्रमण, वहिवाट इत्यादी प्रकारची अपिले दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. या लोकाभिमुख योजनांमधील अपिले लवकरात लवकर निकाली निघण्याच्या उद्देशाने ही अपिले जिल्हास्तरीय उपजिल्हाधिकारी यांचेकडे वर्ग करण्यात येत आहे. वर्ग करण्यात आलेल्या प्रकरणांची यादी संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेले आहे.