नाशिक – निफाड व पिंपळगाव येथील बाजार समित्यांचा बंदिस्त परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या बाजार समित्यांचा परिसर मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७६१ ने कमी झाली आहे. त्यात असणारे सातत्य पाहता जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असून नाशिक जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करतोय, असे दिलासादायक प्रतिपादन भुजबळ यांनी केले.
ऑक्सिजन, इंजेक्शन मुबलक
जिल्ह्यात सद्यस्थितीत रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन यांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्याचप्रमाणे आज जिल्ह्यात रेमडिसिव्हीरची ८ हजार इंजेक्शनस् व ५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार रूग्णांना कोणत्याही औषोधांची व ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत. जसजसे ऑक्सिजनचे उत्पादन वाढेल त्यानुसार उद्योगांनाही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, अशा सूचनाही भुजबळ यावेळी केल्या आहेत.
नाशिक मनपा आयुक्तांनी दखल घ्यावी
तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटरर्स सुविधा हातळण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे खाजगी डॉक्टरांच्या सेवा देखील मानधन तत्वावर घेण्यात याव्यात, ज्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळून शासकीय व शहरातील रुग्णालयांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. खाजगी रूग्णालयांच्याबाबत होणाऱ्या तक्रारींकडे महानगरपालिका आयुक्त यांनी लक्ष देवून खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मालेगावचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक
मालेगावमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सुरूवातीपासूनच प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आज मालेगावचा रिकव्हरी रेट वाढला असून मालेगाव पॅर्टनचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मालेगावमध्ये संसर्ग कमी करण्याच्या दृष्टिने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अवलंब जिल्ह्यातील इतर तालुक्यातही करण्यात यावा, ज्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढण्यास मदत होईल, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.
नवरात्रात यात्रा नाही
कोरोना संसर्गाची पार्श्वभुमी लक्षात घेता येत्या नवरात्रोत्सवात जिल्ह्यामध्ये कोणत्याही यात्रेला परवानगी देण्यात येवू नये. तसेच गडावर येणारे कावडधारक आणि ज्योत घेवून येणाऱ्या भाविकांनी गडावर न जाण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.
रिकव्हरी रेट वाढला
पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आजच्या स्थितीत नाशिक शहराचा रिकव्हरी रेट ९१ टक्के असून मृत्यूदर १.४ टक्के आहे. तर ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६ टक्के आहे, अशी माहितीही यावेळी भुजबळ यांनी दिली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखंडे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेल्या उपाययोजनांची आणि कार्यवाहीची माहिती यावेळी पालकमंत्री यांना दिली.