आमदार दिलीप बनकर यांनी दिली माहिती
……
पिंपळगाव बसवंत, निफाड : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाबार्ड ग्रामीण भागात पायाभूत विकास निधी अंतर्गत शासकीय गोदाम बांधकामांना मंजुरी दिली असून त्यामध्ये पिंपळगाव बसवंत येथे नवीन शासकीय गोदाम बांधकामासाठी रक्कम रु.८.२८ कोटी निधी मंजूर झाले असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.
निफाड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामार्फत नागरीकांना धान्याचे वाटप करण्यात येत असते. सदर धान्याचे शासनाच्या वतीने साठा करणेकरिता या शासकीय गोदामांचा उपयोग करण्यात येत असतो. त्यानुसार निफाड तालुक्यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून नागरीकांना वर्षभरासाठी किती धान्य आवश्यक असते त्यानुसार साठा करून दर महिन्याला किती वाटप करण्यात येते त्यानुसार महिन्याचा साठा गरजेनुसार बाहेर काढण्यात येत असतो. उदा. सुमारे १५५ मे.टन धान्य दरमहा प्राधान्य लाभार्थी आणि अंत्योदय लाभार्थी यांना वाटपासाठी आवश्यक असतो परंतु शासनास वर्षभर वाटपासाठी धान्यसाठा करून ठेवावा लागतो. तसेच शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल त्यास लगेच बाजार पेठेत विकावयाचा नसल्यास शेतीमाल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना भाडेतत्वावर सदर गोदामाचा उपयोग होणार आहे. शेतकरी त्यांच्या अतिरिक्त धान्यसाठ्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कर्जसुद्धा उभे करू शकतात.
सदर शासकीय गोदाम जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत मंजूर झालेले असून ६० x ३० इतक्या जागेत बांधण्यात येणार असून सुमारे ३००० मे.टन क्षमतेचे गोदाम उभे राहणार आहे. पिंपळगाव बसवंत येथील जुने शासकीय गोदाम कार्यान्वित असून सदर गोदामाशेजारी नवीन बांधण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाबार्ड ग्रामीण भागात पायाभूत विकास निधी अंतर्गत पिंपळगाव बसवंत येथे नवीन शासकीय गोदाम बांधकामासाठी रक्कम रु.८.२८ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ यांचे निफाड तालुक्याच्या नागरिकांच्या वतीने आमदार दिलीपराव बनकर यांनी जाहीर आभार मानले.