आमदार दिलीपराव बनकर यांच्या प्रयत्नाने ६ कोटी ९३ लाख निधी प्राप्त…
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांना निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या ओरायत्नातून स्वमालकीची इमारत मिळणार आहे. तालुक्यात एकूण ८ मंडळ अधिकारी कार्यालय व ४२ तलाठी सजा असून यापैकी बहुतांश कार्यालय हे स्वमालकीच्या इमारतीत कार्यान्वित नसल्याने ही कार्यालये स्वमालकीच्या सुसज्ज इमारतीत असावीत हा उद्देश आमदार दिलीप बनकर यांनी लक्षात घेऊन तसेच या कार्यालयांच्या इमारतीची देखील काही दिवसापासुनची मागणी लक्षात घेता निफाड तालुक्यातील ६ मंडळ अधिकारी कार्यालय व १६ तलाठी सजा कार्यालय बांधकामास नुकतीच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.
सदरच्या इमारत बांधकामासाठी मंडळ व तलाठी कार्यालयांना प्रत्येकी ३१ लाख रुपयाप्रमाणे एकूण रक्कम रु.६ कोटी ९३ लाख निधीची तरतूद देखील नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील चांदोरी, रानवड, पालखेड, ओझर, सायखेडा व नांदुरमध्यमेश्वर अशी ६ मंडळ अधिकारी कार्यालयासाठी प्रत्येकी व चांदोरी, चितेगाव, रानवड, उगाव, नांदुर्डी, म्हाळसाकोरे, पालखेड, शिरवाडे वणी, पिंपळगाव बसवंत, कोकणगाव, सायखेडा, करंजगाव, चाटोरी, ओझर, कसबे सुकेणे व तामसवाडी अशा १६ तलाठी सजा कार्यालयांचा समावेश आहे. यामुळे निफाड तालुक्यातील नागरीकांना चांगल्या प्रकारची सेवा या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल.
याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ तसेच महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचे सहकार्य लाभल्याचे माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.