पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील नारायण टेंभी येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास चार वर्षाचा नर बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, परिसरात अजून काही बिबट्यांचा वावर असल्याच्या शक्यतेने शेतक-यांमध्ये दहशत आहे.
काही दिवसापासून नारायण टेंभी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शेतक-यांच्या निदर्शनास आले होते. शेतक-यांनी याबाबत वनविभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. रविवारी रात्री अखेर बिबट्या पिंज-यात जेरबंद झाला. वनविभागाला माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी हजर झाले. यावेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यशवंत भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक व्ही. बी. टेकनर, वनसेवक आर. एल. भोरकडे यांनी घटनास्थळी येत बिबट्याला ताब्यात घेतले.
यावेळी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बाळकृष्ण नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मिथून घोडके, कारसूळचे पोलीस पाटील रमेश ताकाटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कारसूळ-लोणवाडी परिसरात मागील आठवड्यात बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात अजून बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे.