पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील कारसूळ येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतक-यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. कारसूळ, वडाळी नजीक, नारायण टेंभी या गावांच्या परिसरात कादवा नदी वाहते. नदीकाठी मोठमोठी झाडे-झुडूपे आहेत. त्यामुळे बिबट्यांसाठी हा परिसरात सुरक्षित आहे. वडाळी नजीक येथे अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा वावर आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद देखील केले आहे. वडाळीनंतर नारायण टेंभी येथेही बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर बिबट्यांनी आपला मोर्चा कारसूळ गावाकडे वळविला आहे. आठवडाभरात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतक-यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी भाऊसाहेब उगले, प्रवीण ताकाटे, उमेश ताकाटे, संदीप गटकळ या शेतक-यांनी केली आहे.
……
दोन दिवसात पिंजरा लावू
निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर अधिक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहे. दोन दिवसांत गरज नसलेल्या ठिकाणचा पिंजरा काढून तो कारसूळ येथे लावण्यात येईल.
– संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक
बिबट्याला जेरबंद करावे
कारसूळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. मी स्वतः बुधवारी बिबट्याला बघितले. सध्या द्राक्ष बागांची कामे सुरू असल्याने बिबट्यापासून शेतकरी आणि मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
– सोमनाथ देवरे, शेतकरी, कारसूळ