पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या कर्मवीर काकासाहेब वाघ रानवड सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर निफाडचे आमदार दिलीप बनकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्याने शेतकरी कामगार वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
निफाड तालुक्यातील लयास गेलेल्या सहकार क्षेत्रातील महत्वाचा मानला जाणारा रानवड सहकारी साखर कारखाना निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील स्व.अशोकराव बनकर नागरी पतंस्थेस १५ वर्ष कालावधीकरीता भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय गत काही महिन्यांपूर्वी शासन स्तरावरून घेण्यात आला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहीलेल्या निफाड तालुक्यातील निसाका, रासका हे दोन्ही कारखाने सुरू करण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी शासन दरबारी बैठका घेत जीवाचे रान केले होते. विधानसभा निवडणुकीत निफाडची कारखानदारी सुरू करण्याचा दिलेला शब्द आमदार बनकर यांनी रासाकाच्या माध्यमातून खरा करून दाखविला असून स्व अशोकराव बनकर नागरी पतंस्थेच्या माध्यमातून रानवड कारखान्याच्या प्रत्यक्ष कामास पाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ झाल्याने येत्या काळात रानवड कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी कामगार वर्गाला न्याय मिळणार आहे.
या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, बनकर पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, दत्तू पाटील डुकरे, बाळासाहेब बनकर, उमेश जैन, चंद्रकांत राका, गणेश बनकर, साहेबराव देशमाने, आदिंसह शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुढी उभारुन शुभारंभ
रानवड कारखाना कार्यस्थळावर असलेला कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार दिलीप बनकर व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर परिसरात नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्त परिसरात गुढी उभारण्यात येऊन कारखान्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला.