नाशिक – कर्ज देण्याचे आमिष दाखवित विविध कारणाच्या नावाखाली रकमा गोळा करून भामट्यांनी पोबारा केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. संशयितांनी बँकेचे कार्यालय थाटून गरजवंताना लाखोंचा गंडा घातल्याचे बोलले जात असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरीश ज्ञानदेव खरात,संतोष सुरेश खरात,राहूल बद्रीनाथ चव्हाण व सतीष दशरथ वानखेडे अशी संशयितांची नावे असून, याप्रकरणी धनंजय भानूदास कडभाने (हल्ली रा.अशोकनगर,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संशयितांनी शरणपूररोड भागात निधी बँक थाटून हा उद्योग सुरू केला होता. संशयीतांनी के.के.प्लॅनेट टेक्नोलॉजिस प्रा.लि आणि कुबेरशक्ती मल्टीपर्पज इंडिया लि. नावाच्या कंपन्यांच्या माध्यमातून निधी बँकेतून कर्ज पुरवठा आणि जादा व्याज दरावर गुंतवणुक केली जात असल्याचे जाहिर केले होते. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या या बँकेत कर्ज मिळविण्यासाठी कर्जदाराचा सिव्हील स्कोर,उत्पन्न आणि आर्थिक बाजूही तपासली जात नसल्याचे सांगण्यात आल्याने अनेकांनी या बँकेत धाव घेतली होती. बँकेत जाणाºया प्रत्येकाकडून विविध कारणास्तव हजारो रूपये उकळण्यात आले असून ३० ते ३५ तक्रारदार समोर आले आहे. गेल्या महिन्यात संशयीतांनी गाशा गुंडाळल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. तक्रारदार कडभाने यांनी जून महिन्यात बँकेशी संपर्क साधला होता. कर्ज काढून देण्याच्या मोबदल्यात संशयीतांनी त्यांच्यासह समोर आलेल्या तक्रारदारांना सुमारे पावणे तीन लाख रूपयांना गंडविले. ही बाब बँकेने गाशा गुंडाळल्याने समोर आली असून मोठ्या घोटाळ्याच्या आकड्यासह अजून तक्रारदार समोर येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.