मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई दौऱ्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नक्की काय चर्चा झाली याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पुन्हा युतीचे सूर जुळविण्यासाठी ही भेट होती की अन्य काही कारण आहे याबाबत अनेक तर्क लढविले जात आहेत.
भाजप आणि शिवसेना यांचे संबंध अधिक ताणले गेले असताना आणि भाजपकडून दररोज शिवसेनेला लक्ष्य केले जात असताना दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार हे सातत्याने केंद्रातील भाजप सरकारवर तोंडसुख घेत आहे. अशा परिस्थितीत गडकरींनी एकाच दिवशी शिवसेनेच्या दोन नेत्यांची भेट का घेतली, त्यांच्याशी काय चर्चा केली, याची मोठी उत्सुकता सर्वांना लागली आहे.