नाशिक : शहरात सर्वत्र चो-यांचे प्रमाण वाढलेले असतांना पोलीस अधिका-यांना प्रशिक्षण देणा-या नामवंत महाराष्ट्र पोलीस अकादमीत पुन्हा चोरीचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या चोरीप्रकरणी थेट एका राखीव उपनिरीक्षकास अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
कैलास तुकाराम सोनवणे असे अटक केलेल्या संशयीत फौजदाराचे नाव आहे. शहर पोलीस दलातील संशयीत सोनवणे यांना महाराष्ट्र पोलीस अकादमीत राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. राखीव पोलिस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली जाते. त्यामुळे सोनवणे यांच्या वास्तव्याची व्यवस्थाही एमपीए आवारात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक अनिल रामदास लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अकादमीतील निर्माणधीन इनडोअर फायरिंग बट येथे १४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. फायरिंग बटच्या कामासाठी ठेवलेले १५ हजार ४४० रूपये किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेल्याप्रकरणी उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलीसांनी संशयीत उपनिरीक्षकास अटक केली असून त्यास कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याचा जामिन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.