नवी दिल्ली – जवळपास ४० लाख किमी.चे अंतर पार करून नासाचे यान गुरुवार, १८ फेब्रुवारी रोजी मंगळावर उतरणार आहे. या यानाच्या लँडिंगबाबत अमेरिकन अंतराळ संस्थेतील वैज्ञानिक खूप उत्साही आहेत. मंगळावरील शोधाच्या दृष्टीने या रोव्हरचे योग्य पद्धतीने लँडिंग होणे फार आवश्यक आहे. कारण त्यावरच त्याचे पुढील संशोधन अवलंबून आहे. मंगळावर उतरणारे नासाचे हे पाचवे यान आहे. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार, दुपारी ३ वाजूून ५५ मिनिटांनी हे यान मंगळावरील जजीरो क्रेटरवर हे यान उतरायला हवे.
आतापर्यंतचा हा आमचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे नासाने म्हटले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या यानाचा प्रवास अतिशय योग्यरीत्या झाला आहे. आमचे वैज्ञानिक यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. यानाचा प्रवास व्यवस्थित झाला असला तरी याचे लँडिंग वाटते तितके सहजसोपे नाही तर आव्हानात्मक आहे. कारण, येथे मोठ्या प्रमाणावर उंचच उंच टेकड्या, मोठे खडक आहेत.
मंगळावर लँडिंगचे अनेक प्रयत्न फसले असून, केवळ ५० टक्के प्रयत्नच यशस्वी झाले आहेत. याचे मुख्य कारण, म्हणजे तेथील भौगोलिक रचना. ती फार विचित्र आहे. अर्थात आतापर्यंतचा अनुभव गाठीशी असल्याने त्याआधारे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते येथे यशस्वीरित्या लँडिंग करण्याचा प्रयत्न करतील.
नासा मुख्यालयातील शास्त्रज्ञ थॉमस जुर्बुकेन यांच्या मते, हे रोव्हर मंगळावर जीवनाचे काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करेल. शास्त्रज्ञांच्या मते, हे रोव्हर जिथे उतरणार आहे, तिथे कधी काळी एखादी नदी होती. तसेच एक तलावही होता. यामुळेच येथे त्रिभूज प्रदेश तयार झाला असावा. असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी येथे जीवनही असावे.
या प्रोजेक्टचे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर जेरिफर ट्रॉसपर सांगतात की, या क्रेटरमध्ये लँडिंगसाठी आमची टीम सतर्क आहे. इथे व्यवस्थित लँडिंग होईल याची काही खात्री नसली तरीही टीम यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. लँडिंग व्यवस्थित झाले की, या यानाचे काम सुरू होईल.
https://twitter.com/NASA/status/1362259798587289600