वाशिंग्टन : मूळ भारतीय आणि अमेरिकन रहिवासी असलेल्या भव्या लाल यांना १ फेब्रुवारी रोजी नासाने अमेरिकन अवकाश एजन्सीचे कार्यवाहक म्हणून नियुक्त केले असून अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन प्रशासनातील अवकाश क्षेत्रातील निरीक्षक म्हणून त्या काम करणार आहेत.
अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लाल यांना अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा प्रचंड अनुभव आहे. त्या अंतराळ तंत्रज्ञान आणि धोरण समुदायाचे सक्रिय सदस्य देखील आहेत. लाल यांनी न्यूक्लियर सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्स पदवी तसेच मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कडून तंत्रज्ञान आणि धोरण या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याचवेळी, जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी सार्वजनिक धोरण आणि सार्वजनिक प्रशासनात डॉक्टरेट मिळविली आहे.
यापूर्वी, त्यांनी मॅसेच्युसेट्सच्या केंब्रिजमधील अॅबॉट असोसिएट्स इंक येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्रातील संचालक म्हणून काम पाहिले. भव्या यांची या आधीच कार्यक्रमांच्या माध्यमातून नासाशी नाळ जोडली गेली आहे. यापूर्वीच त्या नासाच्या नामांकित प्रोग्राम इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेची सदस्य आहे. लाल यांनी पाच नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनीअरिंग आणि मेडिसिन (एनएएसईएम) समित्यांवरही काम केले आहे.