नाशिक – जिह्यातील अहमदनगर – मनमाड मार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या हाती मोठा दारू साठा लागला आहे. दहा चाकी वाहनातून तब्बल ९४ लाख रूपये किमतीच्या मद्याची बेकायदा वाहतूक केली जात होती. या कारवाईत शहादा जि.नंदूरबार येथील दोन जणांना गजाआड करण्यात आले आहे.
या प्रकरणी संजय साहेबराव पाटील (३६) व काशिनाथ बुधा पाटील (४३ रा.सालदार नगर,जुना प्रकाशा रोड,शहादा) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. नगर – मनमाड मार्गावरून मोठ्या प्रमाणात मद्याची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.४) रात्री पिंपळगाव जलाल शिवारातील येवला टोल नाका भागात वाहन तपासणी सापळा लावण्यात आला होता. भरधाव येणा-या एमएच ०४ डीएस २९२८ या दहाचाकी मालट्रक अडवून तपासणी केली असता हा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला. वरील चालक व क्लिनरला बेड्या ठोकत पथकाने वाहन तपासणी केली असता त्यात ब्ल्यु क्रेशर,ब्लॅक पॅशन,रॉयल रायडर व्हाईट मॅजीक,रॉयल स्टॅग,रॉयल चॅलेंज,इंपेरिअल ब्ल्यू,रॉयल रायडर रेअर ओक,रॉयल डबल,इंपेरिअल वॅट नं.१ आदी प्रकारच्या विदेशी मद्याने भरलेली खोकी मिळून आली. पथकाने वाहनासह मद्यसाठा असा सुमारे ९३ लाख ६३ हजार ४२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयीतांच्या अटकेने बेकायदा मद्यवाहतूकीचा भांडाफोड होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. ही कारवाई पथकाचे निरीक्षक रूषीकेश फुलझळके,दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते,निरीक्षक डी.एन.पोटे,जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके,भाऊसाहेब घुले,लोकेश गायकवाड आदींच्या पथकाने केली. या कारवाईत येवला,मालेगाव,सटाणा,कोपरगाव व नाशिकच्या भरारी पथक क्र.१ च्या कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला. अधिक तपास विभागीय पथकाचे निरीक्षक आर.एम.फुलझळके करीत आहेत.