नाशिक : दुचाकीस्वार महिलेच्या मृत्युनंतर पोलीसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांना आपल्या रडारवर घेतले असून, वेगवेगळया ठिकाणी राबविलेल्या मोहिमेत दोन विक्रेत्यांना बेड्या ठोकत पोलीसांनी ७८ गट्टू (फिरकी) मध्ये भरलेला सुमारे ३५ हजार ८०० रूपये किमतीचा मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
प्रशांत लक्ष्मण दिंडे (३२ रा.अमृत वन गार्डन शेजारी, तवली फाटा) व दानिश इसाक अत्तार (२० रा.मुलतानपुरा,भद्रकाली) अशी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या मांजा विक्रेत्यांची नावे आहेत. मकर संक्राती निमित्त शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. त्यामुळे पशू पक्षांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. गेल्या आठवड्यात महामार्गाच्या उड्डाणपुलावर अशीच दुर्दवी घटना घडली होती. दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेचा नॉयलान मांजाने गळा चिरला गेल्याने तिचा मृत्यु झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी मांजा विक्रेत्यांना आपल्या रडारवर घेतले आहे. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये शहर गुन्हे शाखेने शनिवारी (दि.२) धडक मोहिमेत पतंग विक्री दुकांनाची तपासणी केली. त्यात संशयीत प्रशांत दिंडे याच्या फुलेनगर येथील प्रविण किराणा व जनरल स्टोअर्स या दुकानात सुमारे २९ हजार ३०० रूपये किमतीचे नॉयलान मांजाचे ६५ नग गट्टू मिळून आले. संशयीतास ताब्यात घेत पोलीसांनी मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई मुलतानपुरा भागात करण्यात आली. दानिश अत्तार या विक्रेत्याच्या घरात टाकलेल्या छाप्यात ६ हजार ५०० रूपये किमतीचे १३ नग गट्टू मिळून आले. संशयीतास ताब्यात घेत पोलीसांनी मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार,सहाय्यक आयुक्त मोहन ठाकुर व युनिटचे निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी ,जमादार बेंडकुळे हवालदार अनिल दिघोळे,येवाजी महाले,संजय मुळक,वसंत पांडव,नाजीम पठाण पोलीस नाईक विशाल काठे,मोतीराम चव्हाण,रावजी मगर,शरद सोनवणे,संतोष कोरडे,युवराज गायकवाड शिपाई राहूल पालखेडे,विशाल देवरे,गणेश वडजे,समाधान पवार,प्रविण चव्हाण,समाधान पवार,निलेश भोईर,गौरव खांडरे,प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.
…
…