नाशिक – राज्यात गुटखा आणि सुगंधी सुपारी विक्रीवर निर्बंध असतांना शहरात सर्रास विक्री होणारा गुटख्याचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या हाती लागला आहे. या कारवाईत तब्बल ३२ लाखाच्या गुटख्यासह सुगंधी सुपारी हस्तगत करण्यात येवून मुळ वितरकास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेने गुटखा तस्करीचा भांडाफोड होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दस्तगीर उस्मान शेख (४१ रा.उस्मानिया टॉवर,अमरधामरोड, द्वारका) असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. राज्यात विक्री आणि वाहतुकीस बंदी असतांना शहरात राजरोसपणे गुटखा आणि सुगंधी सुपारीची विक्री होते. काही दिवसांपूर्वीच शहरातील अवैध धंद्याबाबत दस्तरखुद पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी ज्या त्या धंद्यास संबधीत विभाग जबाबदार असल्याचे भाकित केल्याने कारवाईचा धडका सुरू करण्यात आला आहे. यावेळी पांडे यांनी संबधीत विभागांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिल्याने प्रत्येक सरकारी कार्यालयातील यंत्रणा कामाला लागली आहे. यापार्श्वभूमिवर शहरात राजरोसपणे मिळणा-या गुटखा आणि सुगंधीत सुपारीवर एफडीएने लक्ष केंद्रीत केले असून मुळ वितरकांच्या गोडावून धाडी टाकण्यात येत आहेत. अन्न औषध प्रशासन विभागाला मंगळवारी (दि.२४) याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने अमरधाम रोडवरील उस्मानिया टावर या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या उस्मानिया ट्रेडर्स या गोडावूनची झाडाझडती घेतली असता तब्बल ३१ लाख ८१ हजार ६०० रूपये किमतीचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला. पोलीसांच्या मदतीने संशयीतास बेड्या ठोकण्यात आल्या असून याप्रकरणी एफडीएचे अमित रासकर यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या गुटखा किंवा तत्सम पदार्थ जर कुणी विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
…