नाशिक : शहर तसेच परिरातून दुचाकींची चोरी करणा-या चोरटयास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयीताच्या ताब्यातून सव्वा लाख रूपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, ही कारवाई शहर गुन्हेशाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. अनिल जनार्दन भुसारे (२३, रा. उसतळे, ता. पेठ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एक दुचाकी चोर अनंत कान्हेरे मैदान येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक शांंताराम महाले यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, सहायक आयुक्त मोहन ठाकुर, वरिष्ठ निरिक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रविण कोकाटे, प्रविण वाघमारे, महेश साळुंंके, शांताराम महाले, राम बर्डे, समाधान पवार आदींच्या पथकाने मैदानावर सापळा रचून संशयीतास बेड्या ठोकल्या. दुचाकीस्वार संशयीतांने पोलीसांची चाहूल लागताच पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलीसांच्या जाळ््यात अडकला. पोलीस तपासात त्याने ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याची कबुली देत पंंचवटी, गंगापूर, सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तसेच गुजरात राज्यातूनही एक दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. संशयीताच्या कबुलीनंतर ठिकठिकाणाहून १ लाख २५ हजार रूपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संशयीताच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे.
…..