हॉटेलमधून बालकामगाराची सुटका
नाशिक : हॉटेल मध्ये काम करणा-या बालकामगाराची पोलीसांनी सुटका केली. ही कारवाई अमरधामरोडवरील कथडा भागात करण्यात आली. याप्रकरणी हॉटेल मालकाविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश विठ्ठल कुंदळे (रा.नानावली दर्गामागे,अमरधामरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत हॉटेल मालकाचे नाव आहे. कुंदळे यांचे कथडा भागात जय महाकाल नावाचे हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये बालकामगार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.११) पोलीसांनी छापा टाकला असता तेथे बालकामगार मिळून आल्याने पोलीसांनी त्याची सुटका केली. संशयीत स्व:ताच्या फायद्यासाठी आपल्या आस्थापनेत बालकामगारांची नियुक्ती करून त्यांचे कडून कमी वेतनात जास्त काम करून घेत असल्याचे समोर आले. याप्रकरणी शितल वडनेरकर यांच्या तक्रारीवरून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.