नाशिक – लॉकडाऊन काळात बंद हॉटेलमधील वस्तूंची चोरी करून पोबारा करणा-या वेटरला पोलीसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात त्याच्या तीन साथीदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
राहूल संजय तुरे,शिवा राजू उफाडे व अन्य दोन विधी संवर्धीत बालक अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अश्रफ नजिर मणियार (रा.महाराणा प्रताप चौक,सिडको) यांनी तक्रार दाखल केली होती. मणियार पंचवटीतील मार्केट यार्ड शेजारी असलेल्या हॉटेल महाराष्ट्र दरबार येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. लॉकडाऊन काळात हॉटेल बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून हॉटेलमधून ७ पितळी धातूची भांडे,संगणक,इनव्हटर आणि सीसीटिव्ही कॅमेरे असा सुमारे ४६ हजाराचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना २३ मार्च ते २७ आॅगष्ट दरम्यान घडली होती.
पोलीस तपासात या हॉटेलमध्ये वेटरचे काम करणा-या राहूल तुरे याने चोरी केल्याचे पुढे आले होते. मात्र संशयीत पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना खब-याकडून त्याच्या आईचा मोबाईल नंबर मिळाला. त्यामुळे पोलीसांनी अहमदनगर जिह्यातील वीरगाव ता. अकोले हे गाव गाठून त्यास अटक केली. संशयीताने शिवा उफाडे याच्यासह शहरातील दोन अल्पवयीन युवकांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. सर्व संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत व अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,जमादार बाळनाथ ठाकरे,हवालदार विजय मिसाळ,पोलीस नाईक सागर कुलकर्णी,आनंदा चौधरी,किरण सानप शिपाई विलास चारोस्कर,नितीन जगताप,राकेश शिंदे,अविनाश थेटे,गोरक्ष साबळे,कुणाल पचलोरे आदींच्या पथकाने केली.