नाशिक – हातात तलवारी घेवून फिरणा-या दोन जणांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या दोघांमध्ये एका अल्पवयीन युवकाचा समावेश आहे. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून दोन तलवारी हस्तगत केल्या आहेत. दुस-या कारवाईत रस्ता लुट करणा-या संशयीत पोलीसांच्या जाळयात अडकला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने केली.
शहर पोलीसांनी शस्त्रधारींना आपल्या रडारवर घेतले असून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शस्त्रधारींच्या मागावर असतांना हवालदार सुनिल भालेराव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी आडगाव शिवारातील हॉटेल गावरान तडका परिसरात सापळा लावला असता दिनेश तात्याराव तांबे (२० रा.पाटोदा जि.जालना) व त्याचा अल्पवयीन साथीदार पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयीत परिसरात दहशत माजविण्याच्या तयारीत होते. संशयीतांच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात शस्त्र मनाई आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगीक वसाहतीतील लुटमारीच्या गुह्यातील संशयीत पोलीस शिपाई अतुल पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीसांनी जेरबंद केला. विकास उर्फ विकी प्रकाश कंकाळ (१९ रा.भिमनगर,सातपूर) असे संशयीताचे नाव आहे. अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरीचोरीच्या गुह्यात तो पोलीसांना हवा होता. चाकूचा धाकदाखवून त्याने एकास मारहाण करीत बळजबरीने सोनसाखळी आणि हातातील सोन्याची अंगठी काढून पोबारा केला होता. या दोन्ही कारवाया मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन सावंत,उपनिरीक्षक महेश शिंदे, हवालदार भालेराव,नामदेव सोनवणे,पोलीस नाईक श्याम पाटील,शिपाई मिलींग बागुल,विशाल वाघ,अतुल पाटील,युवराज कानमहाले,अनिल शिंदे आदींच्या पथकाने केली.