नाशिक : तुमचे सोन्याचे बिस्कीट खाली पडली असे म्हणत नुकसान टाळत असल्याचे भासवून दोन भामट्यांनी आजीचा विश्वास संपादन केल्यानंतर आजीने भामट्यांच्या हाती आपल्या गळ्यातील ९५ हाजाराची सोन्याची अडीच तोळ्याची पोत काढून दिल्याची घटना शनिवारी (दि. १९) दुपारी नवीन सीबीएस येथे घडली. याप्रकरणी जयवंताबाई चंदर लहामगे (रा. उत्तमनगर) यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवारी दुपारी अडीच्या सुमारास फिर्यादी जयवंताबाई लहामगे या सीबीएस येथे उतरल्या. स्थानकातून बाहेर पडत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी आजी तुमची सोन्याची बिस्कीटे पडली असा आवाज दिला. त्यावर सोन्याची बिस्किटे माझी नसल्याचे लहामगे सांगीतले. मात्र, तरीही संशयितांनी ही बिस्किीटे तुमच्याच पिशवीतून पडली असल्याचे सांगत आम्ही तुमचे नुकसान होण्यापासून वाचवत असल्याचे सांगीतले. तसेच नुकसान टाळल्याबद्दल बक्षिसीची मागणी केली. त्यामुळे फिर्यादी आजीने भामट्यांना बक्षीस म्हणून गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत दिली. काही वेळेनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयवंताबाई यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत भामट्यांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहे.