नाशिक : सराफी दुकान फोडून सोन्याचे दागिने चोरणा-या दोन चोरटयांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम.शहा यांनी दोषी ठरवून अडीच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. सदर घटना हिरावाडीतील त्रिमुर्तीनगर भागात घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हसन हमजा कुट्टी व राजकिशोर लक्ष्मीकांत बोराल (रा.दोघे अश्वमेधनगर,पवार मळा,पेठरोड म्हसरूळ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रत्नाकर काशिनाथ वडनेरे (रा.रविवार कारंजा) यांनी तक्रार दाखल केली होती. वडनेरे यांचे त्रिमुर्ती नगर भागात माऊली ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. १७ आॅगस्ट २०१८ रोजी अज्ञात चोरट्यांनी सराफी दुकान फोडून तब्बल १ लाख ८७ हजार ५०० रूपये किमतीच्या अलंकारांवर डल्ला मारला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक निरीक्षक डी. डी. इंगोले यांनी दोघांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.सरकारी वकिल अॅड.ए.बी.कारंडे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांना हवालदार डी.एस.काकड आणि महिला शिपाई एम.ए.सोनवणे यांनी सहाय्य केले. न्यायालयाने साक्षी पुराव्याच्या आधारे दोघा आरोपींना दोषी ठरवून २ वर्ष ६ महिने सश्रम कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपींनी दंड न भरल्यास १० दिवसांच्या तुरुगावासाची शिक्षाही निकालात नमुद करण्यात आली आहे.