इगतपुरी : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने आणलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यत पोहचतात की नाही, तसेच अनुदानातून साधनसामुग्री उभारुन शेतीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी आज सोमवारी खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघाच्या तालुक्यामधील ग्रामीण भागाचा विशेष पाहणी दौरा केला. कृषी विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह खा. गोडसे यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जावून अनुदानातून साकारलेल्या सामुग्रीची आणि फुललेल्या शेतीची पाहणी केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठिबक सिंचन योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, विमा योजना, मृदा आरोग्य पत्रिका, (माती परिक्षण), कृषी यांत्रिकी योजना आदी महत्त्वाच्या केंद्र शासनाच्या योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विशेष अनुदान दिले जाते. या योजनांचा शेतकऱ्यांना नेमका किती आणि कसा लाभ होतो याची माहिती जाणून घेण्यासाठी आज सोमवारी खासदार गोडसे यांनी कृषी विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांमधील ग्रामीण भागाचा पाहणी दौरा केला.
आज सकाळी नऊ वाजता नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथून पाहणी दौऱ्याला प्रारंभ झाला. दोणवाडे शिवारातील संजय त्र्यंबक सांगळे यांच्या शेडनेट तसेच काशिनाथ वाघ यांच्या पॉलीहाऊसची पाहणी केली. पॉलीहॉऊसमध्ये बहरलेल्या फुलांची बाग पाहून खा. गोडसे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खा. गोडसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेडनेट आणि पॉलीहाऊससाठी शासनाकडून किती अनुदान मिळाले, तसेच पिकांच्या उपयोगासाठी शेडनेटचे महत्त्व जाणून घेतले. यानंतर सोमनाथ सांगळे यांनी शासनाच्या अनुदानातून उभारलेल्या कांदाचाळीची पाहणी करीत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना शासनाकडून पुरेसे अनुदान मिळते का याविषयीची माहिती जाणून घेतली. दुपारी खा. गोडसे आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे विलास बोराडे यांच्या ५६ एकर द्राक्ष बागांची पाहणी केली. द्राक्ष बागेत अनुदानातून टाकलेल्या ठिबक सिंचन योजनेची तसेच बोराडे यांनी उभारलेल्या अद्यावत ॲटोमेशन मॅकेनिझम तंत्राचीही माहिती जाणून घेतली. याप्रसंगी खा. गोडसे यांच्या हस्ते पांढुर्ली शिवारात कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानातील साधन सामुग्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी पांढुर्ली शिवारातील अनेक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यांनतर अधिकाऱ्यांसह खा. गोडसे यांनी इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथे गेले. याठिकाणी ‘विकेल ते पिकेल’ या शासनाच्या धोरणांतर्गंत थेट भाजीपाला केंद्र विक्रीचे उद्घाटन खा. गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले. येथील कार्यक्रम आटोपून खा. गोडसे यांनी इगतपुरी तालुक्यातील त्रिगंलवाडी येथील पाणलोट विकास योजनेतून झालेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली. पाणलोट विकास प्रकल्पाच्या माध्यमातून झालेल्या कामाविषयी खा. गोडसे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पाहणी दौऱ्याप्रसंगी खा. गोडसे यांच्यासह जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, संजय सूर्यवंशी, प्रकल्प उपसंचालक वाणी, सिन्नर तालुका कृषी अधिकारी गारगे, इगतपुरी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर आदींसह ठिकठिकाणचे ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.