सिडकोत महिलेचे मंगळसुत्र खेचले
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना सिडकोत घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदूमती प्रमोद गोळे (रा.मुक्ताई सोसा.कामटवाडे) यांनी तक्रार दाखल केली आहे. गोळे या मंगळवारी (दि.२) रात्री उत्तमनगर येथील शुभम पार्क समोरून दिव्या अॅड लॅबच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. अंबड लिंकरोडने त्या पायी जात असतांना पाठीमागून येणा-या दुचाकीस्वाराने त्यांच्या मानेवर थाप मारून गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
……
चक्कर येवून पडल्याने कारचालकाचा मृत्यु
नाशिक : टोलनाक्यावर फास्ट टॅगची चौकशी करीत असतांना चक्कर येवून बेशुध्द पडल्याने कार चालकाचा मृत्यु झाला. ही घटना शिंदे टोलनाका भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अक्षय अनिल जेडे (२५ रा.जेडे कॉलनी,संगमनेर जि.अहमदनगर) असे मृत कारचालकाचे नाव आहे. जेडे कुटूंबिय बुधवारी (दि.३) आपल्या कारमधून नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. शिंदे टोलनाका येथे कारचालक अक्षय फास्ट टॅगची चौकशी करण्यासाठी आपल्या वाहनातून उतरला असता अचानक चक्कर येवून तो बेशुध्द पडला. भाऊ मयुर जेडे याने त्यास तात्काळ सिन्नर फाटा येथील साई केअर हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.
……
मृतदेहाबाबत नातेवाईकांना आवाहन
नाशिक : झाडावरून पडल्याने जखमी झालेल्या ४५ वर्षीय इसमाचा मृत्यु झाला. सदर इसमाच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस नाईक पी.आर.शिवरामे यांनी केले आहे. राधाकृष्ण अय्यर असे मृताचे नाव असून तो दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास सीटी सेंटर मॉल पाठीमागील चिंचेच्या झाडावरून पडला होता. वाटसरू श्रीकांत वाघ यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. या घटनेस पाच दिवस उलटूनही मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक समोर आले नाही. सदर व्यक्ती शरिराने बारिक,रंगाने सावळा,चेहरा उभट अशा वर्णनाचा असून अंगात ग्रे रंगाचे स्वेटर आणि निळी पॅण्ट परिधान केलेली आहे. या इसमाबाबत माहिती असल्यास गंगापूर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.