नाशिक: कवी अरुण काळे यांच्या ‘सायरनचे शहर’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिकमध्ये १ आँक्टोबर रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे होते. तसेच अरुण काळे यांच्या पत्नी श्रीमती कल्पना काळे आणि कवी काशिनाथ वेलदोडे, प्रदीप जाधव व प्रसिद्ध सुलेखनकार कवी बुध्दभुषण साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबईतील ललित प्रकाशनाच्या शशिकांत पवार यांनी वाचकांची व अभ्यासकांची गरज ओळखून सदर संग्रहाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. समीक्षक मोतीराम कटारे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाला लाभलेली असून, संग्रहाला समर्पक मुखपृष्ठ बुध्दभुषण साळवे यांनी रेखाटले आहे. “या संग्रहातील कवितांमधून मानसातील हिंस्त्रता आणि युध्दखोर प्रव्रुतीचा लेखाजोखा शब्दांकित झालेला आहे. जातीय, धर्मीय द्वेष भावनेतून सामाजातील वंचित समुहावर प्रस्थापितांनी अनादी काळापासून अन्याय अत्याचार केलेले आहेत. दंगलखोर धनदांडग्यांच्या दहशीतीत येथील वाड्यावस्त्या कायमच भयाच्या सावटाखाली वावरलेल्या आहेत. या भयाचं आणि माणसामाणसातील विविध रुपांचं प्रत्ययकारी अक्षरदर्शन अरुण काळे यांच्या प्रस्तुतच्या संग्रहातून घडते” असे प्रतिपादन या प्रसंगी प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले. यावेळी प्रकाशनातर्फे बुध्दभुषण यांच्या हस्ते श्रीमती कल्पना काळे यांना मानधनाचा धनादेश सुपुर्द केला. या प्रकाशन सोहळ्यात प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार कर्डक, मनोज उन्हवणे, महेंद्र बा-हे, विनी काळे व अरुणचे आप्तेष्ट उपस्थित होते. समारंंभाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन कवी नितीन बागूल यांनी केले. श्रीमती कल्पना काळे यांनी प्रकाशन संस्थेचे व उपस्थितांचे आभार मानले.