वृध्देच्या एफडीवर सायबर भामट्यांचा डल्ला
नाशिक : अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी वृध्देच्या बँक खात्याची माहिती मिळवित एफडीच्या रकमेसह बचत खात्यातील रक्कम अशी दोन लाखाची रोकड आॅनलाईन लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमलता गोगटे (रा.गंगापूररोड) या वृध्देने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिन्यात गोगटे यांच्याशी ९८८३०४५६५८ या मोबाईल नंबर धारकाने संपर्क साधला होता. बँक आॅफ बडोदा या बँकेचे व्यवस्थापक ओम प्रकाश असल्याचे भासवून भामट्यांनी हा गंडा घातला. गोगटे यांच्या बचत खात्यास तांत्रीक अडचण आल्याचे सांगून भामट्यांनी वृध्देस बँकेचा अधिकृत एम कनेक्टचा पासवर्ड देण्यास भाग पाडले. या पासवर्डचा वापर करीत भामट्यांनी गोगटे यांच्या बचत खात्यातील व या खात्यास संलग्न असलेल्या तीन एफडी मधील २ लाख ५ हजार ४९९ रूपयांची रोकड आॅनलाईन लांबविली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहे.
….
मोबाईल चोरटा जेरबंद
नाशिक : भाजीपाला खरेदीसाठी मार्केट यार्डात गेलेल्या तरूणाच्या दुचाकीच्या डिक्कीतून मोबाईल लांबविणा-या भामट्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल संजय पवार (रा.नवनाथनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी यश वामनराव बालीगा (रा.सोमवारपेठ नाशिक) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. यश बालीगा गेल्या रविवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी दिंडोरीरोडवरील भाजी मार्केट परिसरात गेला होता. रस्त्याच्या कडेला लावलेल्या त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतील मोबाईल चोरट्यांनी हातोहात लांबविला होता. ही बाब लक्षात येताच यश याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केल्याने भामटा पोलीसांच्या हाती लागला असून अधिक तपास जमादार ठाकरे करीत आहेत.
…..
दोन मोटारसायकली लंपास
नाशिक : एकाच इमारतीतून चोरट्यांंनी दोन मोटारसायकली पळवून नेल्याची घटना महात्मा नगर भागात घडली. या घटनेत बुलेटसह अन्य एक दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधेश्याम रामदेव यादव (रा.वेहमोंट पार्क,एफ रोड, महात्मानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यादव यांच्या बुलेट (एमएच १५ एचएफ ७१२४) व शेजारी पियुश बोरा यांची शाईन दुचाकी (एमएच १५ ई ३२३१) रविवारी (दि.६) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी दोन्ही मोटारसायकली पळवून नेल्या. अधिक तपास पोलीस नाईक झिरवाळ करीत आहेत.