नाशिक : चालकासह किरकोळ विक्रेत्याने मुख्य वितरकास साडे पाच लाख रूपयांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत पोहचविण्यासाठी पाठविलेल्या लोंखडाची (स्टिल) चालक आणि विक्रेत्याने संगणमत करून परस्पर विल्हेवाट लावली असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भगवान साळुंके (रा.ओझर ता.निफाड) व निलेश उत्तम गवळी (रा.देवठाण,अकोले जि.अ.नगर) अशी स्टिल वितरकास गंडविणा-या संशयीताची नावे आहेत. याप्रकरणी ऋषभ विनोद बंसल (रा.शिवाजी नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. बंसल स्टीलचे मुख्य विक्रेते असून त्यांचे आडगाव येथील ट्रक टर्मिनल भागात विजय स्टील नावाचे दुकान आहे. तर संशयीत गवळी यांचे नगर जिह्यात साई ट्रेंडर्स नावाचे किरकोळ विक्रीचे दुकान आहे. बंसल स्टीलचे मुख्य वितरक असल्याने गवळी त्यांच्या कडून माल घेतात. तर संशयीत साळुंके हा आपल्या वाहनातून स्टीलची वाहतूकीचे काम पाहतो. गवळी यांनी गेल्या जून महिन्यात माल साठी आॅर्डर दिली होती. त्यानुसार बंसल यांनी २ जून रोजी जीएसटी भरून सुमारे ५ लाख ६० हजार ६०१ रूपये किमतीचे स्टील साळुंके यांच्या वाहनात लोड करून रवाना केला होता. मात्र पाच महिने उलटूनही मालाचे पैसे न मिळाल्याने बंसल तगादा लावला असता ही घटना घडली. गवळी यांनी माल मिळाला नसल्याचे तर चालक साळुंके याने माल पोहच केल्याचे सांगितल्याने बंसल यांच्या पायाखालची वाळू सरकली. दोघांनी संगनमताने मालाचा अपहार केल्याचे लक्षात येताच बंसल यांनी पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष पाटील करीत आहेत.