सराफी दुकान फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दुचाकी पळवून नेली
नाशिक : सराफी दुकान फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी दुचाकी पळवून नेल्याची घटना कोनार्क नगर भागात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वाहन चोरी आणि घरफोडीचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत दिनकर अहिरराव (रा.श्रीरामनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. अहिरराव यांचे कोणार्क नगर येथील श्रीलखन सोसायटीत आर्या नावाचे सराफी दुकान आहे. मंगळवारी (दि.१६) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील व कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने चोरट्यांनी दुकाना पाठीमागे राहणारे सतिश भावसार यांची घरासमोर लावलेली शाईन (एमएच ४१ एस ५६२६) दुचाकी पळवून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
…….
जातीय तेढ निर्माण करणा-यास अटक
नाशिक : सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट व्हायरल करणा-या एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात व्हॉटसअप ग्रुपमधील चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उर्वरीत संशयीतांचा शोध घेत आहेत. इरफान शेख गुलाम मुर्तुजा शेख असे अटक केलेल्या संशयीताचे नाव असून नितीन आहिरे,महेंद्र कांबळे व एक साथीदार फरार आहे. याप्रकरणी राकेश भागवत (रा.कुंभारवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयीतांनी व्हॉटसअप ग्रुपवर व शेअर चॅटवर आक्षेपार्ह संदेश टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे करीत आहेत.
……