नाशिक : खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या संशयिताकडे दोघा सराईत गुन्हेगारानी न्यायालयातच खंडणी मागितल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश हिरामण दिवे (३८, रा. पेठफाटा) व अरुण गायकवाड (४०, रा. कोळीवाडा, हिरावाडी) अशी खंडणी मागणा-या संशयीतांची नावे असून ते पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. याप्रकरणी पवन शिवाजी कातकाडे (३३, रा. इंदिरानगर) याने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आणि तक्रारदार हे पंचवटीतील एका खुनाच्या गुन्ह्यातील सह आरोपी आहेत. बुधवारी (दि.१७) अतिरीक्त सत्र न्यायालयात तक्रारदार व संशयितांची तारीख होती. दुपारच्या सुमारास तिघे न्यायालयात सुनावणीसाठी समोरासमोर आल्याने हा प्रकार घडला. तक्रारदार पवन कातकाडे परिचीत असलेल्या रोहित उघडे याच्या समवेत बसलेला असताना संशयित दिवे व गायकवाड यांनी त्यास गाठले. यावेळी संशयीतांनी जीवे मारण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. यामुळे पवन कातकाडे याने सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संशयित जयेश दिवे याच्याविरोधात तीन खुन, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न असे दहा हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तर अरुण गायकवाड विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. दिवे हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्याच्यासह टोळीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली होती. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.