शेकोटी पेटविण्याच्या वादातून हाणामारी
नाशिक : शेकोटी पेटविण्याच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. ही घटना बजरंगवाडीतील शनीचौकात घडली. या हाणामारीत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूपेश पिठे या अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.२८) सायंकाळच्या सुमारास मित्र रोहित जाधव व प्रविण पिठे यांच्या समवेत चौकात शेकोटी पेटवून शेकत असतांना सुरेश वसराम परमार (३५),संजय विनोद परमार (२८) व अर्जुन दुधा वाघिला (५० रा.तिघे बजरंगवाडी) आदींनी तिघांना गाठले. यावेळी संशयीतांनी शेकोटी पेटविण्याच्या कारणातून तिघा मित्रांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत सुरेश परमार याने तक्रारदार पिठे याच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तो जखमी झाला आहे. तर संजय परमार या युवकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,सायंकाळच्या सुमारास मित्र सुरेश परमार व अर्जुन वाघेला शनीचौकात शेकोटी पेटवून शेकत असतांना दोन अल्पवयीन मुलांसह प्रविण पिठे या युवकाने या ठिकाणी शेकोटी का पेटविली या कारणातून वाद घातला. यावेळी संशयीतांनी शिवीगाळ करीत तिघा मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संशयीत प्रविण पिठे याने परमार व अर्जुन वाघिला या दोघा मित्रांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून बांबुच्या काठीने मारहाण केली. या घटनेत दोघे मित्र जखमी झाले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार घुगे व माळोदे करीत आहेत.
…..
चक्कर येवून पडल्याने कामगाराचा मृत्यु
नाशिक : काम करीत असतांना चक्कर येवून पडल्याने कारखाना कामगाराचा मृत्यु झाला. ही घटना औद्योगीक वसाहतीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शेखर भगवान कोरडे (४८ रा.निगळ पार्क जवळ,शिवाजीनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. कोरडे औद्योगीक वसाहतीतील पीसीएम फोजझीन अॅण्ड सॅमसिंग या कारखान्यात कामास होते. मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कारखान्यात काम करीत असतांना अचानक चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले होते. मार्केटींग व्यवस्थापक हरपालसिंग यांनी त्यांना तातडीने सिक्ससिग्मा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.