भाजल्याने वृध्देचा मृत्यु
नाशिक : शेकोटीवर शेकत असतांना साडीने पेट घेतल्याने अचानक भाजलेल्या ८५ वर्षीय वृध्देचा मृत्यु झाला. ही घटना चुंचाळे गावात घडली. तब्बल २४ दिवस ही महिला जिल्हा रूग्णालयात मृत्युशी झुंज देत होती. अखेर तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
गिताबाई संभाजी गांगुर्डे (८५ रा.चुंचाळे गाव,अंबड) असे मृत वृध्देचे नाव आहे. गिताबाई २४ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात शेकोटीवर शेकत होत्या. अचानक नऊवारी साडीचा पदर शेकोटीवर पडल्याने ही घटना घडली होती. या घटनेत त्या गंभीर भाजल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. २४ दिवस त्या मृत्युशी झुंज देत होत्या. अखेर बुधवारी (दि.१७) रात्री उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत.
…..
सातपूरला एकाची आत्महत्या
नाशिक : प्रबुध्दनगर भागात राहणा-या ३५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. संतोष उत्तम वावळ (रा.आम्रपाली चौक) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. वावळ यांनी बुधवारी (दि.१७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लाकडी दांड्याला कॉटनच्या कपड्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला त्यात त्याचा मृत्यु झाला. ही बाब सायंकाळी उघडकीस आली. प्रविण साळवे यांनी याप्रकरणी खबर दिल्याने सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.
….
अश्विन विसे बेपत्ता
नाशिक : विसे मळा भागात राहणारे अश्विन प्रकाश विसे (३५) हे गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असून, घरात कुणासही काही एक न सांगता ते निघून गेले आहेत. याप्रकरणी त्यांची आई रंजना विसे यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीसात मिसींग दाखल करण्यात आली आहे. अश्विन विसे शरिराने मध्यम असून उंची साडे पाच फुट,कुरळे केस,दाढी वाढलेली अश्या वर्णनाचे असून त्यांननी अंगात चेक्स शर्ट आणि जिन्स पॅण्ट आणि स्पोर्टस शुज परिधान केले आहेत. सदर व्यक्ती आढळून आल्यास सरकारवाडा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन उपनिरीक्षक संदिप पवार यांनी केले आहे.
……………
दोघा सराईतांच्या घरात धारदारशस्त्र
नाशिक : पंचवटी परिसरात राबविलेल्या गुन्हेगारांच्या घरझडतीत दोघा सराईतांच्या घरात धारदार शस्त्र मिळून आले. मदन मारूती पवार (रा.शनिमंदिर,नवनाथनगर) व प्रविण रामदास कुमावत (रा.पोटींदे चाळ,क्रांतीनगर) असे शस्त्र बाळगणा-या संशयीतांची नावे आहेत. पोलीस आयुक्त दीपक पाण्डये यांच्या आदेशान्वये व उपायुक्त अमोल तांबे सहाय्यक आयुक्त प्रदिप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचवटी वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी (दि.१८) पहाटे परिमंडळ १ मधील गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील खून, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत,प्राणघातक हत्यारांसह दंगा करणे, दरोडा अशा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरतपासणीचा त्यात समावेश आहे. वेगवेगळी सहा पथके तयार करून पहाटे साडे तीन ते सात यावेळेत ही कारवाई करण्यात आली. परिमंडळ १ चे निरीक्षक विलास जाधव यांच्या पथकास संशयीत मदन पवार याच्या घरात लोखंडी कोयता मिळून आला. तर प्रविण कुमावत याच्या घराची युनिट १ चे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत धारदार चॉपर आणि चाकू मिळून आला.