नाशिक – आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महत्वपूर्ण घोषणा केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांची नाशिक शिवसेना महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये तसे जाहिर करण्यात आले आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी करण्यासाठी बडगुजर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बडगुजर यांनी महापालिकेवर भगवा फडकवावा, असेही वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचे बोलले जात आहे. बडगुजर आणि त्यांच्या पत्नी हे दोन्ही सध्या नगरसेवक आहेत. तसेच, त्यांनी महापालिकेतील विविध पदे भूषविली आहेत. शिवाय शिवसेना पक्ष संघटना तसेच वाढीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या निवडीमुळे विविध स्तरावरुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.