नाशिक – नाशिकच्या शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष व ज्येष्ठ कवयित्री शारदाताई गायकवाड यांचे रविवारी दुःखद निधन झाले. साहित्यासाठी खूप तळमळीने झटणारं एक निस्पृह व्यक्तिमत्व हरपलं. काम करण्यातला त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १२ ते १३ साहित्य संमेलन भरवली आहेत. नाशिक मधील गुणवंत महिलांचा सत्कार केला आहे. त्यांनी अनेक माणसं जोडली होती. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राचं नुकसान झालं आहे. अनेक लिहित्या हातांना बळ देणारी उजेडाची सावली हरवली आहे. शारदाताईंच्या “उजेडाची सावली” या कवितेचे अक्षरचित्र चांदवडचे विष्णू थोरे यांनी काढले होते. त्यांच्या या आठवणी जागवत थोरे यांनी कवितेचे अक्षरचित्र पाठवले आहे.