शांतीनगरला ६३ हजाराची घरफोडी
नाशिक : मखमलाबाद येथील शांतीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६३ हजाराचा ऐवज चोरून नेला. त्यात १८ हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमराव भिकाजी भडांगे (रा.रामकृष्णनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. भडांगे कुटूंबिय २४ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ६३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
……
तडीपाराकडून जीवे मारण्याची धमकी
नाशिक : चुलत भावाशी झालेल्या वादाची कुरापत काढून एका तडीपाराने तरूणास कोयत्याचा धाक दाखवित जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गंगापूररोडवरील आदित्य पेट्रोल पंप परिसरात घडली. या घटनेने तडीपार गुंडाचा शहरातील वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम चोथवे (रा.क्रांतीनगर,मखमलाबादरोड) असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी रोशन सुभाष बरू (२७ रा.निगळपार्क,शिवाजीनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. रोशन बरू व त्याचा चुलत भाऊ किशोर बळीराम बरू यांच्या दीड महिन्यापूर्वी वाद झाला होता. या वादातून ही घटना घडली. बरू मंगळवारी (दि.१२) गंगापूररोडने आपल्या वाहनातून प्रवास करीत असतांना आदित्य पेट्रोल पंप परिसरात संशयीत तडिपाराने त्यांचे वाहन अडविले. यावेळी संशयीताने चुलत भावांमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून बरू यास कोयत्याचा धाक दाखवित व शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अधिक तपास पोलीस नाईक महाले करीत आहेत.
……
भाऊबंदकीच्या वादातून पितापुत्रास भोसकले
नाशिक : भाऊबंदकीच्या वादातून एकाच कुटूंबातील तीघांनी पितापुत्रास मारहाण करीत धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना भगूर येथे घडली. संशयीतांमध्ये सासू सूनेचा समावेश असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन नंदकिशोर राजगुरू,संगिता नंदकिशोर राजगुरू आणि जागृती सचिन राजगुरू (रा.सर्व सुभाष रोड,भगुर) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी भुषण मोहन राजगुरू (रा.सुभाषरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.भुषण व त्यांचे वडिल मोहन यशवंत राजगुरू सोमवारी (दि.११) रात्री आपल्या गिरीराज किराणा दुकानात असतांना संशयीतांनी भाऊबंदकीच्या वादातून कुरापत काढून शिवीगाळ करीत बापलेकास मारहाण केली. यावेळी संशयीतांपैकी एकाने धारदार शस्त्राने पितापुत्रावर वार करून जखमी केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोरे करीत आहेत.
…….
मृतवृध्देबाबत त्र्यंबक पोलीसांचे आवाहन
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील जव्हार फाटा भागात अत्यवस्थ अवस्थेत मिळून आलेल्या ६५ ते ७० वर्षीय वृध्द अनोळखी महिलेचा मृत्यु झाला. या महिलेची अद्याप ओळख पटली नसून तिच्याबाबत माहिती असल्यास त्र्यंबकेश्वर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस नाईक मेघराज जाधव यांनी केले आहे. जव्हारफाटा येथील सिंहस्थ बसस्थानक भागात गेल्या शनिवारी (दि.९) रात्री ६५ ते ७० वयोगटातील वृध्द महिला अत्यवस्थ अवस्थेत मिळून आली होती. तिला उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. सदर महिला पाच फुट उंच तसेच रंगाने सावळी,चेहरा उभट,सडपातळ बांध्याची असून तिने गळयात विविध रंगाची माळ, हातात पिवळया धातूच्या बांगड्या परिधान केल्या आहेत. तिच्या ताब्यात निळसर रंगाचे ब्लॅॅॅकेट मिळून आले आहे. सदर महिलेबाबत माहिती असल्यास अथवा नातेवाईकांनी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
………….