नाशिक : नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून नाशिककडे लक्ष द्यावे असे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे नाशिक शहर कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष विजय राऊत यांनी मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.
नाशिक हा कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण मागील काळात झालेल्या चुकांमुळे पक्षाचे नुकसान झाले. दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत देखील नाशिक पूर्व विधानसभेची कॉंगेसची हक्काची जागा कवाडे गटाला सोडून दिल्यामुळे पक्षाचे नुकसान झाले. मागील महानगरपालिका निवडणुकीत देखील अनेक चुका झाल्या त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले आहे.
पण यापूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आतापासून तयारी करणे गरजेचे आहे. नाशिक महानगरपालिका व जिल्हापरिषदेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार असून कॉंग्रेसने निवडणूक स्वबळावर लढवावी.पण स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने तयारी करणे गरजेचे आहे.
शिवाय नाशिक शहर कॉंग्रेस अध्यक्ष यांची प्रदेश कमिटी मध्ये वर्णी लागली आहे. त्यामुळे नाशिक शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा निर्णय तत्काळ घ्यावा जेणेकरून शहर कॉंग्रेसची फेररचना होऊन नवचैतन्य निर्माण होईल अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे नाशिक शहर कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष उपाध्यक्ष विजय राऊत यांनी केली आहे.