नाशिक – जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा ४ जानेवारी पासून सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टिने जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य या प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन करावे. तसेच कोविड लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्व तयारी करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छागन भुजबळ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, मालेगाव महानगरपालिका आयूक्त दिपक कासार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महानगरपालिका नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, आगतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नंदापूरकर, डॉ. उत्कर्ष दुधडीया आदी उपस्थित होते.
कोरोना चाचणी करा, तयारी करा
यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच आरोग्य यंत्रणेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोविड चाचण्या करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जेणेकरून शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत सर्व संबंधित शिक्षक व शाळेतील कर्मचारी वर्ग यांचा कोविड तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होवून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना अडचण निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व नियमित सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहिल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले आहे.
मृत्यू दर कमी
गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या 2.6 टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर 1.6 टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाट येण्याची शक्यता कमी वाटते असे श्री भुजबळ म्हणाले.