टेम्पोसारखी मोठी वाहने देखील चोरीस
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना सुरू असतानाच आता टेम्पोसारखी मोठी वाहने देखील चोरीचे प्रकार सुरू झाले आहेत. माणिकनगर परिसरातून आयशर टेम्पो चोरीला गेल्याप्रकरणी रुपेश आनंदा वालझाडे (रा. गंगावेश, सिन्नर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जानेवारी २०२१ रोजी रुपेश याने त्याचा आयशर टेम्पो क्र. (एमएच ०४ एफजे ९९९२) मोरे मळा, माणिकनगर येथे पार्क केला होता. यावेळी अज्ञात चोरट्याने हा टेम्पो चोरून नेला. याप्रकरणी हवालदार शेख तपास करत आहे.
…..
भरधाव कारने मोटारसायकलला दिली धडक
नाशिक : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव कार चालवून कारचालकाने मोटारसायकलला धडक दिली. यात मोटारसायकल चालक अंकुश दत्तू सुर्यवंशी (रा. नांदूरगाव) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ९) रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी अंकुश हा मोटारसायकल क्र. (एमएच १५ बीएस ८५०९) वरून जत्रा-नांदूर लिंकरोडने जात होता. यावेळी भरधाव वेगाने आलेली कार क्र. (एमएच १५ एफपी १८८८) ने अंकुशच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात अकुंशच्या डाव्या मांडीस व कपाळास गंभीर दुखापत झाली. तसेच कारचालक अपघाताची माहिती न देता पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार गायकवाड तपास करत आहे.
——–
गाडी पार्कच्या वादातून एकास शिवीगाळ व मारहाण
नाशिक : गाडी पार्क करण्यावरून झालेल्या वादातून एकास शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नाझिम मोहम्मद मुल्ला (रा. शक्तीनगर, हिरावाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित महेश यशवंत बनसोडे विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिर्यादी नाझिम मुल्ला हे चहा पिण्यासाठी ओम स्विट अॅण्ड दुग्धालय, दिंडोरी रोड येथे थांबले होते. यावेळी गाडी पार्क करण्यावरून दोघांमध्ये वाद झाले. वाद विकोपाला गेल्याने संशयित बनसोडे याने लोखंडी रोडने फिर्यादीच्या मानेवर दुखापत केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक एस. पी. कुलकर्णी तपास करत आहे.
———
रॉडने मारहाण करून केले जखमी
नाशिक : मोटारसायकलवरून आलेल्या संशयिताने एकास विनाकारण रॉडने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी विजयसिंग धोंडू धांडा (रा. डीजीपीनगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अंड्या (पुर्ण नाव माहिती नाही) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि. ८) रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी विजयसिंग व त्याचा मित्र त्रिमूर्ती चौकातील हॉटेल आदित्य समोर बोलत होते. यावेळी पाठिमागून मोटारसायकवरून आलेल्या तीन इसमांपैकी संशयित अंड्याने त्याच्या हातातील रॉडने विनाकारण फिर्यादीच्या डोक्यात व पाठीत मारून जखमी केले. तसेच अंड्याच्या साथीदारांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कोल्हे तपास करत आहे.
——
चोरट्याने रोकड व सोन्याचे दागीने चोरले
नाशिक : कुलूप तोडून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने रोकड व सोन्याचे दागीने चोरून नेले. याप्रकरणी आनंदा महादू नवले (रा. संजीव नगर, चुंचाळे शिवार) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ११) फिर्यादी यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व खोलीतील लोखंडी कपाटात ठेवलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम, १७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस व १ गॅ्रम वजनाची नथ चोरून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहे.
———-
गळफास घेवून आत्महत्या
नाशिक : राहत्या घरी किचनमध्ये दोरीच्या सह्याने गळफास घेवून एकाने आत्महत्या केली. सुनील गोविंदराव कोकाटे (रा. चुंचाळे) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव असून घटनेचे कारण समजू शकले नाही. शुक्रवारी (दि. १२) दुपारी दोनच्या सुमारास सुनील यांनी किचनमध्ये छताच्या हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकत्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार राऊत तपास करत आहे.