नाशिक – शहर परिसरात महिलांशी संबंधित गुन्हे वाढतच असून गेल्या २४ तासात ४ विविध घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नाशिक पोलिसांनी आता अधिक सजगपणे महिलांच्या गुन्ह्यांकडे पाहण्याची वेळ आली आहे.
गंगापूररोडला महिलेचा विनयभंग
नाशिक – गणेश प्रेस्टीज, हॉटेल राजभोग, गंगापूर रोड येथे महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नितीन पिंगळे (रा.गणेश प्रेस्टीज, गंगापूर रोड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल राजभोगमधील कामाच्या आवाजाबाबत विचारणा करण्याच्या बहाण्याने नितीन पिंगळे याने जवळीक साधत महिलेचा विनयभंग केला. तसेच, पाठलागही केला. त्यानंतर त्याने अश्लील वर्तन केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.
हिरावाडीत महिलेच्या गळ्यातील चेन लांबवली
नाशिक – हिरावाडीतील राजलक्ष्मी बॅक ते ओमनगरकडे जाणार्या कॉलनी रोडवर घराकडे जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावल्याची घटना येथे घडली. याप्रकरणी संगिता शैलेश गाला यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता गाला व त्यांची मुलगी हर्षिदा पायी राजलक्ष्मी बँकेकडून ओमनगरकडे जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन दोनजण त्यांच्याजवळ आले. अचानक दोघेजण जवळ आल्याने संगिता गाला घाबरल्या. त्या पाठीमागे वाकल्या असता दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावळी. त्यांनी आरडाओरड केली असता दोघेजण दुचाकीवरुन फरार झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करत आहेत.
टाकळीरोडला विवाहितेचा छळ
नाशिक – सासरच्या सातजणांनी संगनमताने विवाहितेचा छळ केल्याची घटना चैतन्यनगर, टाकळी रोड येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित अक्षय विनायक तुपलोंढे (सर्वजण रा. चैतन्यनगर, टाकळी रोड, नाशिक), सुलोचना विनायक तुपलोंढे, अश्विनी संतोष तुपलोंढे, वैशाली सुनील तुपलोंढे, संतोष तुपलोंढे, सुनील विनायक तुपलोंढे, योगिता संजय गरुड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१६ ते ऑक्टोबर २०२० या कालावधेत सासरच्या सात जणांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला घरातून हाकलून दिले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. खडके करत आहेत.
सिडकोतही विवाहितेचा छळ
नाशिक – चारित्र्यावर संशय घेत पतीसह सासू आणि सासर्याने विवाहितेचा छळ केल्याची घटना सिडकोत घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित पती महेश दशरथ नेहे (३०, सर्वजण रा. हेडगेवार नगर, त्रिमुर्ती चौक, सिडको, नाशिक), सासू कल्पना दशरथ नेहे (५८), दशरथ शंकर नेहे (६०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, सासू आणि सासर्याने संगनमताने विवाहितेने सोन्याचे दागिने काढून घेतले. तिच्या आईला शिवीगाळ करत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला नांदवायला टाळाटाळ केली. पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.