नाशिक : पशू – पक्षांसह मानवासाठी कर्दनकाळ ठरणा-या नायलॉन मांजा विक्रेत्यांना पोलीसांनी आपल्या रडारवर घेतले असून, शहरात मांजा विक्रेत्यांचा शोध घेतला जात आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ ने टाकलेल्या छाप्यात ६२ फिरक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सुचितानगर भागात करण्यात आली असून याप्रकरणी अल्पवयीन मुलास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरात दिवसागणीक दुर्घटना घडत आहेत. महामार्गावर भारती जाधव नामक दुचाकीस्वार महिलेचा या मांजाने बळी घेतल्याने विके्रत्यांना पोलीसांनी लक्ष केले आहे. एकीकडे कारवाईचा धडाका सुरू असतांनाच दुसरीकडे दुचाकीस्वारांचे गळे मांजामुळे कापले जावू लागल्याच्या घटना वाढल्याने पोलीसांनी आता छापासत्र सुरू केले आहे. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे पथक गुरूवारी (दि.७) मांजा विक्रेत्यांची झाडाझडती घेत असतांनाच शिपाई मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. सुचितानगर येथील एका फ्लॅटमध्ये राजरोजपणे नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी दिपहंस अपार्टमेंट गाठले असता नायलॉन मांजाने भरलेले गट्टू (फिरकी) पोलीसांच्या हाती लागल्या. फ्लॅट नं.५ मध्ये बंदी असलेला मांजा एक अल्पवयीन मुलगा विक्री करीत होता. घटनास्थळावरून नायलॉन मांजाने भरलेले सुमारे ३२ हजार २०० रूपये किमतीचे ६२ नग गट्टू पोलीसांनी हस्तगत केले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलास मुंबईनाका पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात युनिट १ च्या पथकाने सुमारे ७३ हजार रूपये किमतीच्या ७३ फिरक्या हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार संजय मुळक,वसंत पांडव पोलीस नाईक विशाल काठे,फय्याज सय्यद,शरद सोनवणे,संतोष कोरडे,विशाल देवरे,मुक्तार शेख,प्रविण चव्हाण,निलेश भोईर आदींच्या पथकाने केली.