नाशिक – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळतर्फे शहरत १० मार्गांवर सिटीबस सुविधा सुरु करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ५० टक्के क्षमतेने सिटी बस सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, स्थानिकांच्या मागणीनुसार आणखी १० मार्गांवर सिटी बस सेवा पूर्ववत होणार आहे. याअंतर्गत २०६ बस स्टॉपचा समावेश आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाला आर्थिक झळ सोसावी लागली. त्यानंतर अनलॉकमध्ये ५० टक्के क्षमतेसह बससेवा सुरु करण्यात आल्या. परंतु, स्थानिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सिटी बस सेवा पूर्ववत करण्यासाठी परिवहन महामंडळाने २०६ बस स्टॉप समाविष्ट केले आहे. यात गंगापूर, आडगाव, म्हसरूळ आणि मखमलाबाद वगळता इतर सर्व ठिकाणी सिटी बस सेवा पूर्ववत होत असल्याचे परिवहन मंडळाच्या नाशिक आगार येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर संपूर्ण सिटीबस सेवा पूर्ववत करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेसोबत नोकरदार वर्ग, लहानमोठे व्यावसायिक यांसाठी देखील बससेवा पूर्ववत झाल्याचे त्यांनी सांगितले.