नाशिक – शहरात घरफोडीचीचे सत्र सुरूच आहे. वेगवेगळ्या भागात चार घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यात चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी, भद्रकाली आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुना आडगाव नाका भागात राहणाऱ्या माला हरिष तलकेजा (रा. जेठा मार्केट सोसा.) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तलरेजा कुटूंबीय बाहेरगावी गेलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील दोन कपाटांमध्ये ठेवलेली १ लाख १० हजाराची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २० ते २२ सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
दुसरी घटना फुले मार्केट भागात घडली. पाटकरी कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे मोईन नवाज इमाम पाटकरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटकरी कुटुंबीय सोमवारी (दि.२१) आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून सुमारे १४ हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्या. पेठरोडवरील मेहरधाम भागात राहणारे मोहन वामन गोडे (रा.भाग्यश्री सोसा.श्रीधर कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोडे कुटूंबिय मंगळवारी (दि.२२) रात्री आपल्या नातेवाईकांकडे मुक्कामी गेलेले असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ४२ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. दुसरी घटना मखमलाबाद येथील नमन हॉटेल परिसरात घडली. विजय गोविंद चौधरी (रा.स्वामी विवेकानंद नगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौधरी कुटूंबिय मंगळवारी (दि.२२) आपल्या गावी गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिने असा सुमारे ७९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. दोन्ही घटनांप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अनुक्रमे जमादार शेळके व सहाय्यक निरीक्षक अहिरे करीत आहेत.