दोन दुचाकी चोरी
नाशिक – शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या ठिकाणी पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी नाशिकरोड आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घनश्याम तोताराम निकम (रा.सामनगाव,एकलहरा) यांची पॅशन प्लस एमएच १२ सीएम ६३८८ दुचाकी गुरूवारी (दि.१७) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत. दुसरी घटना नाशिक पुणा रोडवरील पासपोर्ट ऑफिस परिसरात घडली. वाडिवऱ्हे ता. इगतपुरी येथील केरू दादा मुर्तडक हे सोमवारी (दि.२१) कामानिमित्त शहरात आले होते. पासपोर्ट आॅफिस शेजारील पतंजली शोरूम समोर त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ ईएच ३२३४ पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार विंचू करीत आहेत.
मासे विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला
नाशिक : उधारीत मासे दिले नाही म्हणून एका माथेफिरू ग्राहकाने कोयत्याने मासे विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना चुंचाळे शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी मनिष सिंग (रा.घरकुल योजना,चुंचाळे शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सिंग आपल्या परिसरात मासे विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी (दि.१९) सांयकाळच्या सुमारास ते आपल्या दुकानावर असतांना त्याच भागात राहणाºया गोपी नामक ग्राहक तेथे आला. त्याने मासे उधार मागितल्याने सिंग यांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयीताने सिंग यांच्या हातातील धारदार कोयता हिसकावून घेत त्यांच्या हातावर व पायावर वार केले. यानंतर संशयीताने शिवीगाळ करीत पोलीसात गेलास तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
टोळक्याकडून एकास मारहाण
नाशिक – किरकोळ कारणातून वाद घालून टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील माऊली लॉन्स भागात घडली. या घटनेत टोळक्याने फायटरने मारहाण केल्याने सदर इसम जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी ठाकरे,शिवम शिंपी,विजय शिंदे,जाकी ठाकरे अशी मारहाण करणाºया संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अजय नामदेव ठाकूर (रा.विखे पाटील शाळेजवळ, डीजीपीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. ठाकूर गेल्या गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या घरी असतांना संशयीत विजय शिंदे यांने त्यांना फोन करून माऊली लॉन्स चौकात बोलावून घेतले. यावेळी संशयीताने अन्य संशयीतांना का शिवीगाळ केली अशी विचारणा केली. यावेळी ठाकूर यांनी मी त्यांना शिवीगाळ केली नाही तू ही मला करू नको असे म्हटल्याने संशयीत टोळक्याने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत ठाकूर यांना फायटरने मारण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
सातपूरला एकाची आत्महत्या
नाशिक – प्रबुध्दनगर येथील ३८ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
किरण बाळू गायकवाड (रा.प्रबुध्दनगर) असे आत्महत्या करणाºया इसमाचे नाव आहे. किरण गायकवाड यांनी मंगळवारी (दि.२२) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला नॉयलॉन दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही घटना निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भिसे करीत आहेत.
चक्कर येवून पडल्याने वृध्दाचा मृत्यू
नाशिक – राहत्या घरात चक्कर येवून पडल्याने ७३ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना लोखंडे मळा भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पन्हालाल महेश बराई (रा.गणपती मंदिरामागे,लोखंडेमळा) असे मृत वृध्दाचे नाव आहे. पन्हालाल बराई बुधवारी (दि.२३) सराळच्या सुमारास आपल्या घरात चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मिसाळ करीत आहेत.