नाशिक – शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी कठोर उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. शहरातील कोरोना स्थितीचा आढावा भुजबळ यांनी घेतला.
भुजबळ यावेळी म्हणाले की, लॉकडाऊनच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्याच्या फलनिष्पत्तीचा विचार करूनच अनलॉक चा निर्णय घेण्यात आलाय परंतु लोकांनी अनलॉक म्हणजे कोरोना गेला आहे की काय अशा अविर्भावात बिनधास्त वावरणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन सर्वांना करायला हवे त्यासाठी शहर पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांनी कठोर उपाययोजना कराव्यात. केवळ दंड करणे हा शासन प्रशासनाचा हेतू नसून जनमानसात नियमांच्या अंमलबजावणीची भावना निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे, असे ते म्हणाले.
तर ती दुकाने बंद
ज्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल त्यास प्रथम समज देण्यात यावी, त्यानंतरही त्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल तर ते दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले.
४ दिवसात अंमलबजावणी करा
योग्य अंतराचे भान राखून भाजीपाल्याचे विक्रीची खुल्या जागांवर व्यवस्था करता येत असेल तर ती निश्चितपणे करण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची असून येणाऱ्या ४ दिवसात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश पालकमंत्री भुजबळ यांनी दिले.